Monday, February 15, 2010

पोलिटीकल सेन्सॉर बोर्ड

आपल्या राज्यघटनेने देशातल्या प्रत्येक नागरीकाला भाषण करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. पण समाजातले सगळेच घटक या हक्काचा वापर करतानाना दिसत नाहीत. पण एक जात मात्र आहे जी या हक्काचा पुरेपूर वापर करताना दिसते ती म्हणजे राजकीय पुढारी..... एक माईकचं बोंडूक हातात मिळालं आणि ऐकायला चार टाळकी समोर दिसली म्हणजे यांची जी ट्यॅ.... सुरू होते की समोरच्याला ते कळो वा ना कळो त्यांना शुद्ध नसते.आता

उदाहरणंच बघाना..... शहराच्या कुठच्याशा एखाद्या गल्लीत... एका नगसेवकाच्या बिल्डींगचं उद्‌घाटन असतं. मग तिथलाच एखादा रस्ता अडवून पेंडॉल टाकला जातो. स्टेजवर....
1। तिथला नगरसेवक,
2। आमदार,
3। प्रमुख पाहुणा म्हणून एखादे राष्ट्रीय नेते,
4। त्याच्या जोडीनं आले म्हणून अध्यक्षपदी बसवलेले आणखी एखादे राष्ट्रीय नेते,
5। विरोधी पक्षातल्या पक्षश्रेष्ठींच्या एकाधीकारशाहीला कंटाळलेला एखादा नेताआणि जोडीला या सगळ्याचे हितचिंतक नेते आणि या सगळ्या गोतावळ्यांचे स्वीय सचिव (म्हणजेच पी. ए.)वगैरे वगैरे लवाजमा असतो।

आता राष्ट्रीय नेता समोर बसलाय म्हटल्यावर गल्लीतल्या नेत्यांना आपली वक्तृत्त्व कला दाखविण्याचं टेंप्टेशन न झाल्यास नवलंच नाहीका....!! मग त्याच्या त्याच्या बावनकशी(पानी) भाषणात गल्लीतल्या उद्योगांपासून दिल्लीतल्या स्वप्नांपर्यंत सगळ्याची झलक मिळते.एकानं पल्लेदार भाषण लावल्यावर इतर गल्लीबहाद्दरांचीही भीड चेपते मग एकावर एक फ्री असल्यासारखे सगळेच आपल्या (न)केलेल्या कामांचे पाढे त्या राष्ट्रीय नेत्याला वाचून दाखवतात।

आता प्रश्‍न असा असतो की एवढा वेळ एका जागी शांत चित्तानं बसून दुसऱ्याचं भाषण ऐकेल तो राष्ट्रीय नेता कसा..? पण त्यांचाही जीव रमविण्यासाठी काहीतरी टाईमपास सुरू असतो. मग शेजाऱ्याच्या मागच्याच्या कानात काही गुजगोष्टी कुजबुजून होतात. दिसताना ते म्हणजे राष्ट्रीय नेत्यानं कानात राजकारणाचे धडे दिल्यासारखं दिसतं प्रत्यक्षात काय असतं देवास ठाउक.....(!), नंतर थोड्या वेळानं समोरच्या तांब्यातलं अथवा बाटलीतलं पाणी पिणं, मध्येच विचारवंतासारखी एखादी पोझ घेउन छायाचित्रकारांना पहिल्या पानासाठीचा फोटो देणं वगैरे टाईमपास सुरू असतो. भाषणबाजीची हद्द झाली की हे राष्ट्रीय नेतेमहाशय पाण्याच्या बाटलीतला शेवटचा घोट घेतात (म्हणजे आवरतं घ्या असं सांगतात) आणि भाषणाला उठायची तयारी करतात, सूत्रसंचालक "उत्सुकतेने वाट पहात असलेलली जनता' वगैरे कोट्या टाकत नेत्याचं (आणि जनतेचंही) मनोधैर्य वाढवतो आणि पेंडॉलमध्ये बहुचर्चित असलेल्या त्या भाषणाला सुरवात होते. हा नेता गल्ली बाहेरच्या भागातले थोडेसे प्रश्‍न वगैरे मांडत न जमणाऱ्या कोट्या करत विरोधी पक्षाची केवीलवाणी चेष्टा करत आपलं भाषण एकदाचं संपवतो आणि नेत्याला भेटण्याच्या निमित्तानं, समोर बसलेले लोक व्हीआयपी गेट मधूनच पेंडॉलबाहेर धूम ठोकतात......

कसं आहे.. यावर कोणतंही ऑबजेक्‍शन घेणं म्हणजे मानवी हक्कांची पायमल्ली करण्यासारखं आहे. पण हे पॉलीटिकल मार्गानं होणारे इमोशनल अत्याचार थांबणार तरी कसे....? खरं तर हा गंभीर प्रश्‍न आहे. त्यामुळे यावर विचार होणं गरजेचं आहे. अगदी नाटक किंवा चित्रपट पाहताना सुद्धा सेन्सॉरनं कात्री लावलेलं प्रमाणपत्र आपल्याला आधी दिसंतं मग या नेत्यांना आवरायला नको का एखादा पोलिटिकलं सेन्सॉर बोर्ड.... अशा एखाद्या बोर्ड समोर मग नेते मंडळी भाषण करण्यापूर्वी त्याची एक कॉपी देतील आणि त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र आणतील आणि असं न करणाऱ्याला काही ठरावीक शिक्षा जसं करीअरमधून वर्षभराचा ब्रेक, सभांमध्ये प्रमुख पाहुणे असताना भाषणबंदी वगैरे ..... मजा येईल ना..... मग तुम्हाला काय वाटतंय

No comments:

Post a Comment